CHRISTMAS WITH CHESSPA

Gift the little ones the joy of ChessPa

Checkout Now!

chesspa christmas banner

ऑरियनप्रो इंटरनॅशनल जीएम बुद्धिबळ स्पर्धेत जगभरातील १९ ग्रँडमास्टर सहभागी होणार

by Vivek Sohani - 07/06/2025

मुंबई, ४ जून: कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये १६ ते २४ जून २०२५ दरम्यान होणाऱ्या ४० लाख रुपयांच्या बक्षीस रकमेच्या ऑरियनप्रो इंटरनॅशनल ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत १९ देशांचे प्रतिनिधित्व करणारे १९ ग्रँडमास्टर (जीएम), ११ इंटरनॅशनल मास्टर (आयएम) आणि चार डब्ल्यूआयएम सहभागी होतील. या स्पर्धेत २५ लाख रुपयांचे बक्षीस असलेली आंतरराष्ट्रीय ओपन ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ आणि १५ लाख रुपयांचे बक्षीस रक्कम असलेल्या १३ वर्षांखालील स्पर्धेचा समावेश आहे. ही स्पर्धा ज्युनियर खेळाडूंसाठी जगातील सर्वाधिक बक्षीस रक्कम असलेली स्पर्धा आहे.



राष्ट्रीय विजेत्या खेळाडूंना मोफत प्रवेश : ज्युनिअर आणि खुल्या स्पर्धेचे आयोजन

१३ वर्षांखालील स्पर्धेत भारतासह परदेशातील युवा बुद्धिबळपटू ७ वर्षांखालील, ९ ​​वर्षांखालील, ११ वर्षांखालील आणि १३ वर्षांखालील अशा चार वयोगटात भाग घेतील. राष्ट्रीय विजेत्यांना मोफत प्रवेश असून निवास व्यवस्था दिली जाणार आहे. राष्ट्रीय शालेय विजेत्यांनाही मोफत प्रवेश मिळेल, ज्यामुळे देशातील सर्वात प्रतिभावंत आणि उदयोन्मुख प्रतिभांना ही स्पर्धा उपलब्ध होईल.

"बुद्धिबळ खेळ आता काही भौगोलिक क्षेत्रांपुरते मर्यादित राहिलेला नाही; तो जगभरात वेगाने आणि व्यापकपणे विस्तारत आहे," असे ऑरियनप्रो सोल्युशन्सचे ग्रुप सीईओ आशिष राय म्हणाले. "जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी सज्ज असलेल्या धाडसी, हुशार खेळाडूंची लाट आपल्याला पाहायला मिळत आहे. ही स्पर्धा म्हणजे अफाट, अप्रयुक्त क्षमतेने भरलेल्या एका नवीन युगाची सुरुवात आहे, असे ते पुढे म्हणाले.

युवा बुद्धिबळ विकासातील एक प्रतिष्ठित संस्था असलेल्या इंडियन चेस स्कूलद्वारे ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. देशभरातून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही सहभाग अपेक्षित असल्याने, ही स्पर्धा तरुण प्रतिभेला एक्सपोजर, अनुभव आणि ओळख मिळविण्यासाठी एक अनोखा टप्पा प्रदान करते.

"तरुणांमध्ये विश्लेषणात्मक विचार आणि मानसिक लवचिकता निर्माण करणे हे नेहमीच या स्पर्धेचे उद्दिष्ट राहिले आहे," असे इंडियन चेस स्कूलचे संस्थापक प्रफुल्ल झवेरी म्हणाले. "ज्या कौशल्यांमुळे महान बुद्धिबळपटू निर्माण होतात तेच कौशल्य आजच्या डिजिटल आव्हानांना तोंड देण्यासाठी महत्त्वाचे आहे, हे ऑरियनप्रो सारख्या टेक कंपनीने हे ओळखणे प्रेरणादायी आहे. रणनीती ही एक सार्वत्रिक भाषा आहे, मग ती तंत्रज्ञानात असो किंवा बोर्डवर, ही भागीदारी या कल्पनेला पुष्टी देते," असे त्यांनी पुढे म्हटले.

या भागीदारीसह, ऑरियनप्रो आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा ही युवा बुद्धिबळातील एक अग्रगण्य स्पर्धा बनण्यास सज्ज आहे. त्यामुळे खेळाच्या भविष्यासाठी एक शक्तिशाली पाऊल पुढे जाईल. या स्पर्धेने मागील आवृत्त्यांमध्ये ज्युनियर विजेते दिले आहेत, ज्यांनी जागतिक बुद्धिबळ स्तरावर स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यात विद्यमान जागतिक विजेता गुकेश यांचा समावेश आहे.

२०१६ साली झालेल्या पहिल्या स्पर्धेचे विजेते : रौनक साधवानी & स्वप्नील धोपाडे (दोघेही ग्रँडमास्टर असून स्वप्नील खूप नावाजलेले कोच आहेत) | फोटो : मुंबई आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा फेसबुक पेज

प्रग्नानंधा ज्युनिअर ग्रुप न खेळता खुल्या गटात खेळला आणि तिथेही त्याने विशेष उल्लेखनीय कामगिरी केली | फोटो : मुंबई आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा फेसबुक पेज

आदित्य मित्तल आणि गुकेश यांच्यातील डाव सुरु होतानाचा क्षण! ह्या दोघांनीही उत्तुंग भरारी घेतली आहे आणि गुकेश तर विश्वविजेता बनला आहे! | फोटो : मुंबई आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा फेसबुक पेज

परहम मगसूदलू आणि एक स्पर्धा जिंकले असतानाचा हा क्षण! आनंद जणू आपला वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी गुकेश्ला प्रोत्साहित करतोय!! | फोटो : मुंबई आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा फेसबुक पेज

ह्याच स्पर्धेत गुकेशने २५०० रेटिंग क्रॉस केले होते आणि सर्वात लहान वयात ग्रँडमास्टर होण्याच्या विक्रमात तो फक्त काही दिवसांनी मागे राहिला होता! | फोटो : मुंबई आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा फेसबुक पेज

सध्याची महाराष्ट्राची आणि भारताचीही आघाडीची खेळाडू दिव्या देशमुख देखील ह्याच स्पर्धेत अनेकदा खेळली आहे! | फोटो : मुंबई आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा फेसबुक पेज

ग्रँडमास्टर स्पर्धेतील अव्वल तीन विजेत्यांना अनुक्रमे ४ लाख, ३ लाख आणि दोन लाख रुपयांचे बक्षीस मिळेल. ज्युनियर स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे ३ लाख, २ लाख आणि १ लाख रुपये मिळतील. भारताचा ग्रँडमास्टर दिप्तयन घोष याला ग्रँडमास्टर स्पर्धेसाठी अव्वल मानांकन (सीडिंग) देण्यात आले आहे. जॉर्जियाचा ग्रँडमास्टर लेवन पंतसुलिया आणि आर्मेनियाचा ग्रँडमास्टर पेट्रोस्यान मॅन्युएल यांना अनुक्रमे दुसरे आणि तिसरे सीडिंग आहे.

ज्युनियर स्पर्धेत ६ देशांच्या खेळाडूंचा सहभाग असून मुंबईचा १२ वर्षीय फिडेमास्टर अंश नेरुरकर याला अव्वल मानांकन देण्यात आले आहे. टॉप फोर सीडेड खेळाडूंमध्ये कॅन्डिडेट मास्टर माधवेंद्र शर्मा, श्रीलंकेची डब्ल्यूआयएम ओशिनी गुणवर्धना, अमेरिकेचा हरिकृष्ण पी. आणि इंग्लंडचा समर दयाल यांचा समावेश आहे.

महत्वाच्या लिंक्स :

मुंबई आंतरराष्ट्रीय खुली स्पर्धा : चेस रिझल्ट्स

मुंबई आंतरराष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धा : चेस रिझल्ट्स

स्पर्धेचे इन्स्टाग्राम

स्पर्धा प्रमुख श्री. प्रफुल झवेरी यांची मुलाखत | व्हिडिओ : चेसबेस इंडिया मराठी



Contact Us